मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या व मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज (१५ डिसेंबर) जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा केली.
घोषणेनुसार, राज्यातील एकूण २९ पैकी २७ महानगरपालिकांची मुदत संपलेली असून, सर्व महापालिकांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन विकासकामे, घोषणा आणि निर्णयांवर तात्काळ निर्बंध आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयारीला वेग आला आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्याने आता प्रचाराचे कार्यक्रम जोर धरतील. इच्छुक उमेदवारांचे घरोघरी भेटीगाठी, बैठका, संघटनात्मक हालचाली सुरू होणार असून, महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांच्या निकालांवर राज्यातील भविष्यातील राजकीय समीकरणेही अवलंबून राहणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
23 ते 30 डिसेंबर 2025 नामनिर्देशन पत्र दाखल करणे
छाननी 31 Dec 2025
माघार 2 जानेवारी 2026
चिन्हवाटप अंतिम उमेदवार यादी
3 जानेवारी 2026
मतदान 15 जानेवारी 2026
मतमोजणी
16 जानेवारी 2026



