मुंबई : वृत्तसंस्था
मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळ आधीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी कळवा येथील आयोगाच्या कार्यालयात आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत आंदोलन सुरू केले होते. अनेक मतदारांची नावे दुबार नोंदवण्यात आली असून, मृत व्यक्तींची नावेही यादीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सपाट जमिनीवर इमारती दाखवून मतदारांची नोंदणी केल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.
या मुद्द्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. “तुमच्या तक्रारी सोडवण्यात येत आहेत,” एवढेच सांगत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यातच निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइटही बंद असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अधिकच वाढला.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. मनपा निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



