मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने, येत्या महिन्यात राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंनी हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आता विरोधकांनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आयोगाची ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे, असा थेट सवाल करत त्यांनी मतदार याद्यांतील कथित घोळावर बोट ठेवले. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका, दुबार नोंदी व अनियमितता असल्याचा आरोप करत, त्या आधी दुरुस्त न करता थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे म्हणजे जनतेची फरफट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आधी झालेल्या चुका आयोगाने मान्य करून त्या कशा दुरुस्त केल्या याची सविस्तर माहिती जनतेला द्यावी, अशी ठाम मागणी पेडणेकर यांनी केली. मतदार यादीतील घोळ स्पष्ट न करता थेट तारखा जाहीर केल्या गेल्या, तर तो लोकशाही प्रक्रियेचा अपमान ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. विरोधकांनी आवाज उठवला तर निवडणुकांना विरोध करणारे म्हणून ठपका ठेवला जाईल; मात्र आमचा निवडणुकांना विरोध नसून मतदार यादीतील चुका आधी दुरुस्त व्हाव्यात, हीच आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किमान ७० ते ७५ टक्के चुका पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे. अन्यथा ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व विश्वासार्ह राहणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.



