मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, कर्जमाफीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळावा यावर सरकारचा ठाम भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेसंदर्भातील अधिकृत घोषणा १ जुलैपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सिंचनाचा एकूण १३ लाख ८३ हजार हेक्टरचा अनुशेष होता. त्यापैकी १३ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राचा अनुशेष पूर्ण करण्यात आला असून, आता अकोला, बुलडाणा व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील केवळ ४९ हजार हेक्टरचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात दुष्काळ हा भूतकाळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०३५ चा अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, २०४७ च्या विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. “मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही आहे आणि चंद्र-सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राचीच राहील,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या इतिहासाला योग्य स्थान देण्यात आले असून, आता मराठा साम्राज्याचा इतिहास २१ पानांचा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह सर्व लोककल्याणकारी योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याची तिजोरी अमर्याद नाही, मात्र सर्व निकषांवर सक्षम अशी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात २०२६ पर्यंत १२ ते १३ हजार मेगावॅट वीजनिर्मिती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २६ हजार ६८१ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून, १६ हजार मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र सौर ऊर्जा कंपनी स्थापन करण्यात आली असून, आतापर्यंत ३ हजार मेगावॅट निर्मिती पूर्ण झाली आहे.
या योजनांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असून, महावितरणची सुमारे १० हजार कोटींची बचत होणार आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत देशात बसवण्यात आलेल्या ११ लाख ९० हजार सौर पंपांपैकी ७ लाख ३८ हजार पंप एकट्या महाराष्ट्रात देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत विजेचे दर दरवर्षी २ टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.



