नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारला महत्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे.
योजनेच्या बहुतांश लाभार्थी या ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला आहेत. ई-केवायसी करताना त्यांच्याकडून काही त्रुटी होणे नैसर्गिक असल्याने, अशा चुका सुधारण्याबाबत विभागाकडे अनेक विनंत्या आल्या होत्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात असल्याने, झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर, ज्या लाभार्थींचे पती किंवा वडील हयात नसतील, अशा महिलांना स्वतंत्रपणे ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
ई-केवायसीमध्ये सुधारणा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 1 कोटी 74 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, काही महिलांकडून प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरली गेली असल्याचे लक्षात आल्यानंतर, विभागाने ती दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे लाभार्थींनी पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



