मुंबई : वृत्तसंस्था
एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई कोणती असेल, तर ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे चाहतेच असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी हीच संपत्ती आजही तितकीच जिवंत आहे. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले बिग बी आजही आपल्या चाहत्यांच्या प्रेमाने भारावून जातात.
दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर त्यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते गर्दी करतात. चाहत्यांना निराश न करता बिग बी स्वतः बाहेर येऊन त्यांना अभिवादन करतात, संवाद साधतात आणि कधी कधी भेटवस्तूही देतात. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियासोबतच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधूनही मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही मिळणारे प्रेम हे एक आशीर्वाद असल्याचे त्यांनी नमूद केले. “माझ्यावर एवढं प्रेम का केलं जातं, हे मला स्वतःलाही कधी कधी कळत नाही,” अशी भावुक कबुली त्यांनी दिली आहे.
हजारो चाहते रांगेत उभे राहून बिग बींची एक झलक पाहत असल्याचे दृश्य त्यांच्या शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओतून दिसते. स्पष्ट विचार आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचा संदेश देत, दुसऱ्यांच्या सल्ल्यामुळे विचार गोंधळात पडू शकतात, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. त्यामुळेच आजही अमिताभ बच्चन यांचे ब्लॉग आणि विचार वाचणाऱ्यांची संख्या मोठी आहे.



