अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील गांधली येथून १० रोजी बेपत्ता झालेल्या १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी गावातीलच एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधली येथील जयश्री संजय संदानशिव (वय १८) ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी १० रोजी दुपारी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र तिचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता.
दरम्यान, १२ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता जयश्रीच्या वडिलांना सुनील पाटील यांचा फोन आला. त्यांनी गांधली येथील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली. मृतदेहाजवळ काळ्या रंगाची ओढणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती मिळताच जयश्रीचे वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केल्यानंतर विहिरीत आढळलेला मृतदेह जयश्रीचाच असल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती वडिलांनी पोलिसांना दिल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत असून मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे गांधली गावात शोककळा पसरली आहे.


