नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू होईल.
विशेष म्हणजे, १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमांनंतर तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.महापालिका निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. २०१७ मध्ये घोषणा आणि मतदानात दोन महिन्यांचे अंतर ठेवण्यात आले होते; मात्र या वेळी प्रक्रिया मोठ्या वेगाने राबवली जाईल.
निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाचा दिवस निश्चित करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान ठेवल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, असा अनुभव लक्षात घेऊनच ही तारखेची शक्यता वर्तवली जात आहे.



