मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखल देण्याचे काम सुरू झाले. मराठावाड्यातील आठ जिल्ह्यात यानंतर मराठा समाजातील अर्जदाराला कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू झालं आहे. इतक्या लोकांना त्याचा फायदा झाला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.
त्यात सर्वाधिक ४४५ अर्ज ही एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात त्यापैकी ४७ कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. उर्वरित अर्जाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जातं आहे. मराठा समाजाला कुणबी, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हैदराबाद गझेटिअर् लागू करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी राज्य सरकारने २ सप्टेंबरला मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासाठी लागणारे हैदराबाद गझेटिअर् काढले. पण, प्रत्यक्षात शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या मराठा समाजाच्या फक्त ९८ जणांनाच हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १४ अर्ज आली आहेत, त्यात एकालाही प्रमाणपत्र मिळाले नाही.
जालना जिल्ह्यातून ७८ अर्ज आले, ८ जणांना प्रमाणपत्र मिळाली.
बीड जिल्ह्यात २२ अर्ज आले होते, त्या २२ जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
लातूर १२ अर्ज, ९ जणांना प्रमाणपत्र मिळाली.
धाराशिव जिल्ह्यात १३ अर्जापैकी ४ जणांना प्रमाणपत्र मिळाली.
परभणी जिल्ह्यात ४४५ अर्ज, ४७ प्रमाणपत्र मिळाली.
हिंगोली ५ अर्ज, ३ प्रमाणपत्रे मिळाली.
नांदेड जिल्ह्यातील ५ अर्जा पैकी ५ जणांना प्रमाणपत्रे मिळाली.



