धुळे : प्रतिनिधी
तालुक्यातील फागणे गावानजीक गुरुवारी सायंकाळी दुचाकीने धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दोघांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेले दोघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून जळगावकडे जात असताना फागणे गावापुढे भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीपक मोतीलाल भामरे (वय ४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलवले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



