नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आज सरकारला मनमानी करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचा टाईम बदलत असतो. प्रत्येकाची वेळ सारखी नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात मनमानी करू नका, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना बचतीचा सल्ला दिला.
जयंत पाटील यांनी आज चालू आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. त्यात त्यांनी कन्सलटन्ट नेमण्याच्या पद्धतीवरून सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ई गव्हर्नस 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी आयटी कन्सलटन्ट नेमण्याचे पेव आता सर्व विभागात आले आहे. सरकारने या कन्सलटन्टवर 5 हजार कोटींचा खर्च आला आहे. म्हणजे सरकार कन्सलटन्टवर 5 हजार कोटी खर्च करत आहे, पण साधा शिपाई भरती करण्यास सरकार नकार देते. गट ड ची पदे तर लॅप्सच करण्यात आली.
ते पुढे म्हणाले, आयटी कन्सलटन्ट नेमताना काही ठराविक कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ते आयटी कन्सलटन्ट, आयटी प्रोजेक्टसह सर्वच क्षेत्रात शासनाला सल्ला देतात. बर या सल्लागारांचे शिक्षण तरी त्या क्षेत्रातील असावे. पण मास मीडिया केलेला सल्लागार मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे याबाबत सल्ला देऊ शकतो का? हा चिंतेचा व आश्चर्याचा प्रश्न आहे. पण त्याची नेमणूक सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. म्हणजे कुणी विचारत नाही. विरोधी पक्ष फार बारीक झाला आहे म्हणून मनमानी किती करायची? शेवटी हे सर्व रेकॉर्डवर राहते. प्रत्येकाचा टाईम बदलत असतो, प्रत्येकाचा टाईम एकसारखा नसतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या सावधपणे केल्या पाहिजेत.
जयंत पाटील म्हणाले, कन्सलटन्ट संस्कृतीला आळा घातला पाहिजे. अर्थमंत्री इथे बसलेत. त्यांच्याकडे पैशांचा तुटवडा असेल तर त्यांना कन्सलटन्टच्या खर्चावर पैसे वाचवता येतील. अजित पवारांनी यात लक्ष घालावे. कोणत्या विभागाने कोणते सल्लागार नेमलेत. त्यांची पात्रता काय आहे, त्यांना पैसे किती दिले जात आहेत हे तपासून पाहा. या प्रकरणी कुठेतरी चाप लागला पाहिजे असे मला वाटते.


