नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपुर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हे अधिवेशन विविध प्रश्नांमुळे वादळी होताना दिसत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य प्रश्नावर सभागृहात बोलताना आक्रमक होत आहेत. अशातच एक मोठी घडामोड घडली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नुकेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेले सोडचिठ्ठी दिलेले प्रकाश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी नागपुरात रामगिरी या बंगल्यावर दाखल झाले असून, त्यांनी भेटीअगोदर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंविषयी मोठं वक्तव्य केले असून, भाजपात जाण्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.
मनसेचे पहिल्या फळीतील प्रकाश महाजन हे नेते होते. त्यांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांना साथ देत वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले. पण पक्षातील अंतर्गत राजकारणावरून त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाजन भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता तर थेट ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने भाजपमध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. एवढेच नव्हे तर प्रकाश महाजन पूर्वी मनसेमध्ये असलेले आणि आता भाजपात सहभागी झालेल्या वैभव खेडेकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
राज ठाकरेंविषयी थेट वक्तव्य
माझे वैयक्तिक काम असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले. मुख्यमंत्र्यांसमोबत पारिवारिक संबंथ असल्याचे ते म्हणाले. मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपाने ठरवायचं आहे, असे सूचक विधान करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत प्रकाश महाजन यांनी दिले आहेत. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे लक्ष असणार आहे. मी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असे थेट वक्तव्य देखील प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंविषयी केले आहे.


