जळगाव : प्रतिनिधी
चोपडा बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत ६९ वर्षीय वृद्धाच्या पॅन्टच्या खिशातून ५० हजार रुपये चोरणारा पोलीस रेकॉर्डवरील सराईत पाकीटमार नाजिम कदिर पटवे उर्फ नाजिम तरकारी (रा. गेंदालाल मिल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत जेरबंद केले.
सविस्तर वृत्तानुसार, धरणगाव येथील मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन हे चोपडा–धरणगाव बसमध्ये चढत असताना गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ५० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासादरम्यान ही चोरी कुख्यात पाकीटमार नाजिम तरकारीने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, विष्णू बिऱ्हाडे, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रगडे व रविंद्र कापडणे यांच्या पथकाला कामावर लागविण्यात आले. पथकाने नाजिम पटवे याला काही तासांतच ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुलीही दिली. नाजिमवर यापूर्वीही जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली.


