जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसीमधील साई किसान या ठिबक नळ्या तयार करणाऱ्या कंपनीला मोठी आग लागून ती आजूबाजूच्या दोन कंपन्यापर्यंत पोहोचली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशामन दलाच्या वतीने सुरू होते. मंगळवारीच या कंपनीमधील ट्रांसफार्मर व कट आउट बदलविण्यात आले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीची साई किसान नावाची ठिबक नळी तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये नियमित काम सुरू असताना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमधील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. आग लागताच ती गोदामाच्या दिशेने पसरली व काही क्षणात बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचाही स्फोट झाला.
ज्या कंपनीमध्ये आग लागली त्या ठिकाणी मंगळवारी ट्रांसफार्मर व कट आउट बदलविण्यात आले होते, अशी माहिती कंपनी मालक जगन्नाथ जाधव यांनी दिली. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिका अग्निशमन विभागाच्या चार बंबांसह भुसावळ, वरणगाव, नशिराबाद व जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे बंब दाखल झाले. याद्वारे आग विझविण्यान्यात आली. मात्र तोवर आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली.


