सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अशातच ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत एन्ट्री झाली आहे.
त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरून होती, अखेर सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी मनसे महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सहभागी झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे.
माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष), माकप आणि मनसे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. मनसेसोबत आघाडीचे मैदान सजत असल्यामुळे स्थानिक स्तरावरील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वाढली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला उमेदवारी आणि प्रचारात पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
सोलापूर पॅटर्न राज्यातही राबविणार?
दरम्यान, या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील मनसे महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकाळे एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेणारे ‘ठाकरे बंधूं’चे पक्ष सोलापूर महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये पक्षांमधील अंतर्गत धूसफुस असल्याची सतत चर्चा होत असते. तसेच महायुतीमध्ये कोणतेही वितुष्ठ नाही, असे नेत्यांकडून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यामुळे मविआने सोलापूर महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेत नवी राजकीय समीकरण प्रस्तापित केले आहे. यामुळे ‘सोलापूर पॅटर्न’ राज्यभरातील राबविला जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.



