मुंबई : वृत्तसंस्था
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्यावर आधारित ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस उतरले. धर्मवीर 2 मध्ये दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र त्यांच्या निधनाबाबत आजही विविध चर्चा सुरु असतात. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर 3’वर महत्त्वपूर्ण वक्तव्य करत नवी चर्चा पेटवली आहे.
एका कार्यक्रमात शिंदेंना धर्मवीर 3 चित्रपट येणार का? आणि त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आनंद दिघे यांचं काम इतकं मोठं आहे की ते एक-दोन चित्रपटांत मांडता येणार नाही. पण धर्मवीर 3 चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, कारण त्यानंतर पुढे काय झालं हे मलाच माहिती आहे.” शिंदेंच्या या वक्तव्यामुळे धर्मवीर मालिकेच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
यावेळी शिंदेंनी सध्याच्या सरकारच्या कामगिरीवरही भाष्य केले. “साडेतीन वर्षांच्या सरकारला मी 100 टक्के मार्क देणार आहे. आम्ही तिघेजण तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. नगरपालिका निवडणुकीत विरोधक दिसलेच नाहीत. त्यांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. फेसबुक लाईव्हवरून तरी सभा करायला हव्या होत्या,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
पुढे ते म्हणाले, “मी दिल्लीत गेलो किंवा दरेगावाला गेलो तरी चर्चा सुरू होते. आम्ही एनडीएचा मोठा घटकपक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतो. कोणत्याही नाराजीसाठी आम्ही जात नाही. राज्यातील प्रश्न आम्ही तिघे सोडवतो. महाराष्ट्राच्या विकासासाठीच आम्ही दिल्लीत जातो. पंतप्रधान मोदी देश पुढे नेत आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत.”
दरम्यान, २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडून एकनाथ शिंदेंनी बंड पुकारले. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘धर्मवीर 2’ प्रदर्शित झाला होता. आता शिंदेंच्या नुकत्याच केलेल्या विधानानंतर ‘धर्मवीर 3’ची चर्चा पुन्हा एकदा गतीने रंगू लागली आहे.


