बीड : वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना, सरकारने आरोपींना एका वर्षात फाशी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “या प्रकरणातील आरोपी सुटले, त्या दिवशी प्रथम जिल्हा आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद करू,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
गत वर्षी ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडचे नाव समोर आल्याने मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. प्रकरणातील आतापर्यंत ८ आरोपींना अटक झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मस्साजोग येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
सरकारने या हत्येचा निकाल एका वर्षात लावून आरोपींना फाशी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तसे न झाल्याने जरांगेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली. “अजितदादांच्या गटातील एक आमदार टायर पंक्चर करून बसला आहे. तोच संपूर्ण यंत्रणा चालवत असून तपासाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “परळीवाल्यांनी माणसं पेरून आरोपी सुटणार असल्याच्या चर्चा पसरवल्या आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, “ही इतकी क्रूर हत्या आहे की, कुटुंबीयांनी पुकारा दिला तर आम्ही कुठल्याही विचारात पडणार नाही. एका लेकीला आणि एका लेकाला आज त्यांच्या वडिलांचा चेहरा दिसत नाही. हे प्रकरण सरकारने चार–पाच महिन्यांत संपवावे. आरोपींना फाशी दिल्याशिवाय आमचे समाधान नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”
या प्रकरणातील मुख्य संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याचे त्यांनी सांगितले. “आंधळेने हत्या करताना व्हिडिओ कॉल केला होता. तो सापडला तर मोठा उलगडा होईल. इतकी क्रूर हत्या करणारे मोकाट फिरत आहेत आणि सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. फडणवीस यांच्या शब्दांवर आम्ही शांत बसलो होतो, पण सरकार दबाव आणते आहे का, तेही पाहायला हवे,” असे जरांगे म्हणाले.



