नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून महाविकास आघाडी (मविआ) आणि सत्ताधारी महायुतीत मोठ्या राजकीय पेचाची स्थिती निर्माण झाली आहे. मविआने विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे भास्कर जाधव आणि विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांची अधिकृतरित्या मागणी केली असतानाच, राजकीय वर्तुळात दोन नवी सरप्राइजिंग नावे समोर आली आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांची चर्चा अचानक सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांसाठी मविआमध्ये जाधव आणि पाटील यांच्या नावांवर एकमत झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दोन्ही नावे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडे पत्राद्वारे सादरही करण्यात आली आहेत. मात्र, अचानक वडेट्टीवार आणि परब यांच्या नावांची चर्चा का वाढली, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते झाल्यास त्यांचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील मंत्र्यांवर असू शकतो, अशी भीती शिंदे गटाला असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच वडेट्टीवार यांच्या नावावर चर्चा सुरू करण्यामागे भाजपची राजकीय खेळी असल्याचेही निरीक्षकांना वाटत आहे. वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षनेते पदाची तीव्र टीका तिन्ही पक्षांकडे समानरित्या वळेल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचेही चर्चेत आहे.
भाजपने काही मविआ नेत्यांशीही या संदर्भात संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून मोठे राजकीय घमासान पेटले असून पुढील काही तासांत यावर मोठे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



