नागपूर : वृत्तसंस्था
पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित जमीन घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांनी दमानिया यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार प्रहार केला आहे.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अनिल पाटील म्हणाले, “अंजली दमानिया सुपारी घेऊन काम करतात. त्या ज्यांच्या इशाऱ्यावर चालतात, त्या मास्टरमाइंडचा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा आहे.” अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार दमानिया यांना कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी केला. पाटील पुढे म्हणाले, “कधी अजित पवार, तर कधी धनंजय मुंडे— ज्यांची सुपारी घेतली असेल त्यांच्यावर आरोप करणे हा दमानिया यांचा उद्योग झाला आहे.”
पार्थ पवार प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दोन समित्या नेमून चौकशी सुरू आहे आणि आवश्यक ती कारवाईही करण्यात आली आहे. “इतके सर्व सुरू असताना केवळ अजित पवार आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी दमानिया काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. दमानिया यांच्यावर आरोप करताना पाटील यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले. “त्या स्वतःच्या बुध्दीने चालत नाहीत; त्यांना ज्यांना अजित पवारांची ॲलर्जी आहे असे कुणीतरी मास्टरमाइंड चालवते. हा मास्टरमाइंड लवकरच जनतेसमोर उघडा पडेल,” असे ते म्हणाले.



