जळगाव : प्रतिनिधी
नशिराबादकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दोनदा उलटले व दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडकले. या विचित्र व भीषण अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून कारमधील दोघे युवक-युवती गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, दि. ७ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बायपासवरील आव्हाणे शिवारात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरील बायपास मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याच मार्गावरून तरसोद फाट्याकडून (एमएच 19 EG 1878) क्रमांकाची कार पाळधीकडे जात होती. दरम्यान, अचानक टायर फुटल्याने वाहनाचा तोल सुटला व कार दोनदा उलटून दुभाजक ओलांडत पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या (CJ 07 BR 3717) क्रमांकाच्या ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर आदळली. अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे मोडून पडला. यात यश रमेश शिंपी (23, रा. पाळधी, ता. धरणगाव) व पल्लवी छाडीकर (20, रा. मेहरुण) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हाताला दुखापत झाली असून यश शिंपी यांच्या पायालाही गंभीर मार बसला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रेलर चालकाची चौकशी करून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. मात्र या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झाली नव्हती. बायपासवरील वाढत्या वाहनवेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.



