मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांचा एकमेव उद्योग म्हणजे टोमणे मारणे आणि टीका करणे असा घणाघाती आरोप शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे, याच्याशी तुम्हाला काय देणे-घेणे? तुम्ही तुमचे पाहा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
शिरसाट म्हणाले, “तुमचे स्वतःचे अस्तित्व काय आहे, हे आधी पहा. स्वतःच पक्ष सोडून आता इतरांच्या पक्षात नाक खूपसण्याचे कारण काय?” आम्ही कसे काम करतो हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आमच्या पद्धतीवर टीका करून काहीही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवरूनही शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. “दिल्लीला जाऊन कोणाचीही गळाभेट घ्या, पण आमची चिंता का करता? तुमच्या सांगण्याने पक्ष चालतो का? आमच्या नेत्यांना पक्ष कसा चालवायचा हे चांगलेच माहिती आहे,” असा पलटवार त्यांनी केला.
“आमचा पक्ष आम्हीच चालवतो; एकनाथ शिंदे शिवसेना चालवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार चालवतात,” असे सांगत शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.



