मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील घटकपक्षांमध्ये सध्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यामुळे भाजपचा ॲॅनाकोंडा या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महायुतीवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटात शनिवारी मुंबई व उपनगरातील अनेक पक्षप्रवेश झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, विरोधी पक्षनेत्यांचा अभाव, मतदारयाद्यांतील सावळा गोंधळ, भाजपची कथित दंडेलशाही आदी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्या निवडणुकीचा सीजन सुरू आहे. त्यात गडबड घोटाळेही सुरू आहेत. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांचा वाईट अनुभव येत आहे. सुप्रीम कोर्टाने नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, पालिका निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. पण अजूनही मुंबई व इतर शहरातील मतदारयाद्यांत जो प्रचंड घोळ आहे, त्यावर कुणीच बोलत नाहीत. याची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली पाहिजे.
सुप्रीम कोर्ट भटक्या कुत्र्यांसह इतर प्रकरणांत स्वतःहून लक्ष घालते. पण हा लोकशाहीचा विषय आहे. त्यामु्ळे कोर्टाने स्वतःहून त्यात लक्ष घातले पाहिजे. मतदारयाद्यांतील घोळाविषयी आपण काय करत आहात? हा घोळ निकाली निघत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती आम्ही कोर्टाकडे केली पाहिजे., असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या मारामाऱ्या सुरू आहेत. आतापर्यंत असे प्रकार आपण दुसऱ्या राज्यांतच पाहत होतो. तिकडे बंदुका निघत होत्या. मारामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा जनतेच्या हिताचा नाही. स्वतःची पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची घरे भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशावेळी आपल्यासारख्या सुजान नागरीक शिवसेनेकडे येत आहेत. कारण, जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसत आहे, जिच्या हातात मशाल आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महायुतीतील घटकपक्षांना देवेंद्र फडणवीस चालवत असल्याच्या दाव्यावरही भाष्य केले. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकच आहेत. महायुतीमधील पक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्या भाजपच्या बी टीम आहेत. मी असे म्हणेन की, त्यांचा मालक एकच आहे. भाजपच्या ॲॅनाकोंडाचा अनुभव आता या पक्षांना येत आहे. हा ॲॅनाकोंडा आता शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला गिळल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



