जळगाव : प्रतिनिधी
अयोध्याहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर शनिवार पहाटे काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे सुमारे ४ वाजता हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणे होळ येथील अंदाजे ४० भाविक रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर बसने प्रयागराजकडे रवाना झाले होते. सुलतानपूरच्या कुरेभर चौकाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले. उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक व रस्त्यावरून जाणारे प्रवासी तात्काळ मदतीला धावले. जखमींना तातडीने कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच जळगाव व धरणगाव प्रशासनाने तातडीने संपर्क व समन्वय सुरू केला आहे. फिरायला गेलेल्या सर्व भाविकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संवाद केला जात आहे. या घटनेमुळे कल्याणे होळ गावात शोककळा पसरली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



