मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह सोहळा बहरीन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पवार आणि पाटील कुटुंबीयांनी बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा रंगतदार माहोल तयार करण्यात आला होता. जय पवार आणि साताऱ्यातील फलटणचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रविण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील विवाहबंधनात अडकले आहेत. 5 डिसेंबर रोजी दोघांचा विधीवत लग्नसोहळा साक्षीदारांच्या उपस्थितीत झाला.
या खास विवाहसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागले असून चाहत्यांमध्ये या लग्नाची चर्चा रंगत आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर काही खास क्षण शेअर केल्यानंतर हा लग्नसोहळा अधिक चर्चेत आला. वरातीदरम्यान सैराट चित्रपटातील लोकप्रिय झिंगाट गाण्यावर अजित पवार आणि रोहित पवार यांनी केलेला डान्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्यांच्या या बेधुंद नृत्याचे व्हिडीओ सध्या मोठ्या वेगाने व्हायरल होत आहेत. कुटुंबीयांची आनंदी मुद्रा आणि संपूर्ण वातावरणातील जल्लोष यामुळे या सोहळ्याची रंगत आणखी वाढली.
लग्नपत्रिकेनुसार कार्यक्रमांची शृंखला 4 डिसेंबरपासूनच सुरू झाली होती. पहिल्या दिवशी मेहेंदीचा कार्यक्रम रंगला तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संगीताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेवटचा दिवस म्हणजे 7 डिसेंबरला नवरदेव-नवरीसाठी खास स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती.
बहरिनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि जल्लोषात पार पडलेला पवार-पाटील कुटुंबाचा हा विवाह सोहळा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घराणे, मान्यवर आणि नातेवाईकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक शोभून दिसला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या नव्या आयुष्याला शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पवार कुटुंबाचा हा आनंदाचा क्षण अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरूनही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून या नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून मंगलकामना व्यक्त केल्या जात आहेत.



