अहिल्यानगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील जामखेड येथील नृत्यांगना दिपाली पाटील (वय 35) यांनी येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या आहेत. त्यांच्याच पतीविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने जामखेड शहरात खळबळ उडाली असून भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही घटना गुरुवार (ता. ०४) रोजी घडली आणि या संदर्भातील गुन्हा शुक्रवारी (ता. ०५ ) दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्या मैत्रिणींना मी बाजारात जाऊन येते असं सांगून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने मैत्रिणींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. ज्या रिक्षाने त्या साई लॉजपर्यंत गेल्या होत्या, त्या रिक्षाचालकाकडून चौकशी केली असता त्याने त्यांना लॉजमध्ये सोडल्याचं सांगितलं. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रूम आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं धक्कादायक दृश्य दिसलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणी दिपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासंदर्भात जामखेड तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात वेगळा सोशल व्यक्त केला आणि पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे या प्रकरणी लिहिले की, “जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.”



