मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमधील कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या धक्कादायक वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना “भाजप तर देवाभाऊमय आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात” असे विधान केले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात लोढा यांनी फडणवीसांचे नेतृत्व अधोरेखित करत त्यांच्याबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. मात्र त्यातील ‘इतर पक्षही देवाभाऊंच्या संकेतावर चालतात’ या विधानाने चर्चांना उधाण आले आहे.
लोढा म्हणाले की, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप पूर्ण तयारी करत आहे. “मुंबई हे आपलं घर आहे. महापालिका जिंकायची असेल तर ही लढाई केवळ अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची नाही, तर संपूर्ण पक्षाची आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसला तर आपलीही कॉलर टाईट होईल” असे ते म्हणाले. लोढांच्या वादग्रस्त विधानावर आता विरोधक कोणती भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विधानसभेपासून महापालिका निवडणुकांपर्यंत या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



