यवतमाळ : प्रतिनिधी
चंद्रपूर–यवतमाळ महामार्गावर वेग आणि चुकीच्या ओव्हरटेकमुळे गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अंदाजे १४ जण जखमी झाले आहेत. मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ रात्री आठच्या सुमारास एसटी बस आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेची तीव्रता इतकी भयानक होती की एसटी बसची ड्रायव्हर साइड अक्षरशः दबून वाहनाचा पुढील भाग दोन तुकड्यांत विभक्त झाला.
वणीवरून करंजीकडे निघालेली एसटी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. दरम्यान, करंजीकडून येणाऱ्या ट्रकचालकाने वेगाने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी ट्रक थेट बसवर जाऊन आदळला. धडकेनंतर बसचे सांगाडे रस्त्यावर विखुरले व प्रवाशांच्या भीषण किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. मारेगाव पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिका पथकांनी सर्व जखमींना यवतमाळ, पांढरकवडा, मारेगाव आणि करंजी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. चुकीच्या ओव्हरटेकमुळे घडलेला हा अपघात महामार्ग सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. याच दिवशी लातूरमध्ये आणखी एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर रत्नागिरीत बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचाव झाला. सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाहतूक शिस्त, वेगनियंत्रण आणि कडक अंमलबजावणी याची तातडीची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



