देशी विदेशी दारूसह ३ लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अकलूद शिवारातील परमिटरूम व बिअरबारचे हॉटेल फोडून देशी, विदेशी दारूचे बॉक्स व इतर समान असा एकुण ३ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत बुधवार ६ जुलै रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन प्रल्हाद पवार (वय-४०) रा. नालंदा नगर, भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे यावल तालुक्यातील दुसखेडा रोडवरील अकलूद शिवारात आनंद परमिटरूम व बिअर बार नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ५ जूलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश करत दुकानातील महागड्या देशी व विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या, सीसीटीव्ही डिव्हीआर, मॉनीटर, इन्हवर्टर, बॅटरी, इंटरनेट राऊटर, मिस्कर, भांडी, इंलेक्ट्रीक सामान असा एकुण ३ लाख ९० हजार ९३० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नेहमीप्रमाणे बुधवारी ६ जुलै रोजी सकाळी आल्यावर त्यांचे हॉटेलचे शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी आत प्रवेश केला तर त्यांच्या हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात बुधवार ६ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.