सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपालिका व नगपरिषदेच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे तब्बल 18 दिवस ईव्हीएमवर कडा पहारा ठेवण्याचे आव्हान आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदानात तब्बल 2900 मतांचा फरक आल्यामुळे मोठा राडा झाला आहे.
आष्टा नगरपरिषदेसाठी शहरात एकूण 30,574 मतदार आहेत. त्यापैकी 22,864 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. पण आता प्रशासनाने काल दिलेली आकडेवारी व आता पोर्टलवर दिसणाऱ्या आकडेवारीत तब्बल 2 हजारांहून अधिक मतांचा फरक दिसून येत आहे. पोर्टलवर एकूण मतसंख्या 33,328 दाखवण्यात आली आहे. एका प्रभागात 1311 मतदार असताना 4077 मतदारसंख्या दाखवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकूण मतदार 3056 आहेत. त्यापैकी 2394 मतदान झाले. पण पोर्टलवर 1795 दाखवण्यात आले आहे. आष्टा शहर विकास आघाडीच्या वैभव शिंदे यांनी स्ट्राँग रूमबाहेर जात निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.
मतदान व त्यानंतर आयोगाने ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत प्रचंड तफावत असल्याची गोष्ट शहरात पसरताच अनेकांनी स्ट्राँग रूमच्या दिशेने धाव घेतली. यामुळे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर शेकडो नागरीक जमलेत. त्यांनी तिथे एकप्रकारे ठिय्या आंदोलन केले आहे. या सर्वांनी प्रशासनाने काल रात्री दिलेल्या आकडेवारीत व सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास 2 हजार मतांची वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत ईव्हीएमची कडेकोट सुरक्षा करण्याची मागणी केली. स्ट्राँगरूमबाहेर 24 तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्राँग रुमबाहेर नियुक्त करा, या भागात जॅमर बसवा. पहिल्या रात्रीच हा गोंधळा झाला तर पुढे काय होईल? असे विविध प्रश्न व मागण्या त्यांनी केल्या आहेत. झालेले एकूण मतदान व जाहीर करण्यात आलेल्या मतदानात तफावत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. ही आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्टा बंद करू, असा इशाराही आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी दिला आहे.


