मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याचा एक फोटो समोर आला आहे. मुंबईतील एका खाजगी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली.
या दोघांमध्ये साधारण 20 मिनिटे चर्चा झाल्याचे म्हंटले जात आहे. या भेटीने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. आयएएस अधिकारी नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही आहेत. कौटुंबिक कार्यक्रम म्हणून संजय राऊत कुटुंबासह या विवाहाला उपस्थित होते.
तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विवाह सोहळ्याला उपस्थित राहत नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत त्यांच्या उपचारांची माहिती घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. दरम्यान, संजय राऊत हे आजारपणातून बरे झाल्यानंतर राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. नुकतंच त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका करत विविध विषयांवर भाष्य केले.


