मुंबई : वृत्तसंस्था
स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘संचार साथी’ अॅपमागे मुळात हेरगिरीसाठी वापरले जाणारे पेगासस तंत्रज्ञानच वापरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना केली.
ठाकरे म्हणाले, “लोकांनी ज्यांना मतदान केले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर पाळत ठेवावी. दिल्लीतील बॉम्बस्फोट, पहलगाममधील घुसखोरी – या प्रश्नांवर सरकारचे मौन चिंताजनक आहे.” ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पुन्हा अनेक कार्यकर्त्यांनी पुनर्प्रवेश केला. “गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते परत येत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
केंद्राच्या नामांतर धोरणावर टीका करत ठाकरे म्हणाले, “राजभवनाचे ‘लोकभवन’, पीएमओचे ‘सेवातीर्थ’—असे नावांमागे सरकार आणखी गुप्त खेळ करते आहे. पेगाससचे संचार साथी करण्यात याचाच भाग आहे.” तसेच एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर प्रहार करत ठाकरे म्हणाले, “पुढील महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होत असताना सत्ताधाऱ्यांतच हाणामाऱ्या, पैशांची उधळण सुरू आहे. धाडीही निवडक पद्धतीने टाकल्या जात आहेत.” “भाजप म्हणजे देशाचा तारणहार असा समज करून देणे हा मोठा घोटाळा आहे. अनेकजण आता जागे होत आहेत. आगामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


