बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत सुरू असताना बुलढाण्यात बोगस मतदानाचे गंभीर आरोप काँग्रेसने केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलावर पोलिसांशी दमदाटी व शिवीगाळ करून बोगस मतदारांना पळवून लावल्याचा आरोप केला आहे.
राज्यात आज विविध नगरपरिषद व नगरपंचायतींचे मतदान होत आहे. सकाळी काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या असल्या, तरी त्यानंतर प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. मात्र याचदरम्यान बुलढाण्यात सर्रास बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचा दावा काँग्रेसने केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत आहेत.” काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा काही बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले असताना, आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी थेट पोलिसांशी हुज्जत घालत, शिवीगाळ करत त्या बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणावर सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “कुणाल गायकवाड यांच्यावर बोगस मतदान, सरकारी कामात अडथळा आणि धमकीचे गुन्हे तत्काळ दाखल करून अटक करावी.” बुलढाण्यातील या प्रकारामुळे स्थानिक निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.


