लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती.
सदा सरवणकर यांनी आज सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर शिवतीर्थावर त्यांना भेटीसाठी राजकीय नेत्यांची रांग लागली. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांची विचारपूस करण्यास राज्यातील चालू घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सदा सरवणकर हे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत.
या भेटीत सरवणकर यांची मुलगी आणि मुलगा समाधान उपस्थित होते. राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदू पुरस्कर्ते आणि जननायक आहेत तसेच माझे शेजारीही आहेत. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी मला वेळ दिल्याने मी आभारी आहे, असे सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.