कराड : वृत्तसंस्था
कोकण सहलीवरून नाशिकला परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला मंगळवारी पहाटे पुणे–बंगळुरू महामार्गावर अपघात झाला. बस 20 फूट खोल दरीत कोसळली असून 30 ते 35 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. यापैकी 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त बस नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी पी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची आहे. विद्यार्थ्यांची कोकण शैक्षणिक सहल आटोपून बस नाशिककडे रवाना झाली होती. कराडजवळील वाठार गावाच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याचा एक भाग दबला होता. हा दबलेला भाग न लक्षात आल्याने बस घसरली आणि रस्त्यालगतच्या 20 फूट खोल दरीत कोसळली.
अपघातानंतर बसमध्ये मोठा आरडाओरडा माजला. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. कराड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.


