अहिल्यानगर : वृत्तसंस्था
जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचंड तापलेल्या वातावरणात सोमवारी एक नाट्यमय घटना घडली. प्रचारासाठी शहरात दाखल झालेल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक निदर्शने करत गोंधळ निर्माण केला. हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
आमदार रोहित पवार व विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपनेही जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे. फडणवीस प्रचारासाठी पोहोचताच ठाकरे गटाने हल्लाबोल केला. आंदोलकांनी दाखवलेल्या पोस्टर्सवर जामखेडच्या विकासकामांबाबत खोचक सवालांची मालिकाच झळकली.
पोस्टर्सवर विचारण्यात आले — जामखेडची MIDC कुणी रोखली? अध्यात्मिक स्थळांचा निधी आणि शहराचा विकास निधी कुणी अडवला? CCTV प्रकल्प रखडण्यामागे कोण? गुंडांना परदेशात कुणी पळवले?
या पोस्टर्समुळे वातावरण आणखी तापले. कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त उभारला होता. तालुकाप्रमुख मयुर डोके, विधानसभा प्रमुख गणेश उगले, नितीन ससाने, योगेश शिंदे, संदीप उगले, संयोग सोनवणे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, रोहित पवार यांनी ही निवडणूक ‘विकास विरुद्ध गुन्हेगार’ या मुद्द्यावर आधीच केंद्रित केली आहे. रविवारीच शहरात एका निनावी पत्रकाने खळबळ उडाली होती. त्यात भर म्हणजे आजच्या पोस्टरबाजीमुळे जामखेडमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.


