भंडारा : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना भंडाऱ्यातून एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. भाजपच्या एका महिला उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भाजपची टोपी आणि गळ्यात कमळाचा गमच्छा घातल्याचा संतापजनक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराज आमच्याच पक्षात आहेत, हे दाखवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रकार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भंडारा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार मतदारांच्या संपर्कात व्यस्त आहेत. शहराच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या महिला उमेदवार प्रचारादरम्यान या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आल्या. त्यांनी प्रथम महाराजांच्या गळ्यात कमळाचा गमच्छा घातला आणि त्यानंतर भाजपची टोपी पुतळ्याच्या जिरेटोपीवर ठेवली. त्यांच्या या कृतीमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या जनमानसात अत्यंत जिव्हाळ्याचे मानले जाते. त्यामुळे एका उमेदवाराने पुतळ्यावर पक्षीय चिन्हांचे साहित्य चढवल्याने भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकाराला तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे.


