सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे सेनेच्या माजी आमदारांच्या संपर्क कार्यालयावरही स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकल्याची बातमी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेत टोकाचा तणाव निर्माण झाला आहे. यातूनच चार दिवसांपूर्वी हिंगोलीतील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या घरावर १०० पोलिसांनी छापा टाकला, असा खळबळजनक आरोप केला होता. याच पक्षाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनीही या प्रकरणाची थेट विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. यापाठोपाठ आता शिंदेसेनेचे निकटवर्तीय नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयावरही स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारीच सांगोल्यात प्रचार सभा झाली. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. सांगोल्यात नगर पालिका निवडणुकीत शेकापचे आमदार बाबासाहेब पाटील व भाजपने हातमिळवणी करत शिंदेसेनेला आव्हान दिले आहे. त्यावरून शहाजीबापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपवर कठोर टीका केली होती. रविवारी शहाजी बापूंची प्रचाराची सांगता झाली. यानंतर काही वेळातच सोलापूरहून आलेल्या एलसीबी पथकासह निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी रात्री १०.३० वाजता अचानक शहाजी बापूंच्या कार्यालयात जाऊन सुमारे एक तास झाडाझडती घेतली. कार्यालयातील काही दस्तएेवज, विविध कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. या वेळी पाटील मात्र कार्यालयात नव्हते.


