धरणगाव पोलीसांना दिले निवेदन…
धरणगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात यावी आणि गुलाबराव वाघ यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीचे निवेदन धरणगाव पोलीसांना देण्यात आले.
गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना ह्या संघटनेचे काम करीत आहे. शिवसेना या संघटनेचे कार्यालय प्रमुख पासून ते जळगाव जिल्हा प्रमुख म्हणुन काम करतोय. सद्या शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणुन काम करीत आहे.
शिवसेनेत काम करीत असतांना अनेकदा संघटनेची ध्येय धोरण राबवित असतांना अनेक लोकांच्या विरोधात काम करावे लागते. त्यामुळेच मला सुमारे १०-१५ वर्षा पुर्वीसुध्दा अनेकदा जिवेठार मारण्याचा धमक्या मिळालेल्या होत्या. त्यावेळेस मी सदर आपल्या कार्यालयात पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळेस आपल्या कार्यालयाने चौकशी करुन मला पोलिस संरक्षण दिले होते. त्यामुळे माझ्या जिवाचे रक्षण होऊन मला त्यावेळेस न्याय मिळालेला होता.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती अस्थिरतेची झालेली आहे. शिवसेना या पक्षाचे ३९ आमदार यांनी बंडखोरी केलेली असून त्यात जिल्ह्यातील ५ आमदार असून त्यातील ३ आमदार हे मी काम करीत आहे. ते तिघेही आमदार जळगाव लोकसभा मतदार संघातील आहेत. त्यांनी केलेल्या बंडामुळे जन माणसात त्यांचाविरुध्द वातावरण तयार झालेले आहे. शिवसेना पक्षाच्या मी एकनिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी असल्याने मी सर्व बंडखोराविरुध्द जिल्हा भरात आवाज उठविलेला आहे. मला जिल्ह्या भरातून तसेच मी राहतो त्या मतदार संघातून मला मोठया प्रमाणावर समर्थन मिळत आहे. याच बाबीचा माझ्या विरोधकांनी तसेच बंडखोर आमदार व समर्थकांना वाईट वाटत आहे. त्यामुळे माझा वैयक्तीक व्देष व मत्सर त्यांना वाटू लागलेला आहे. त्यांचा माझ्या बाबतीचा व्देषयुक्त हेतू वाढलेला आहे.
शनिवारी २ जुलै रोजी जळगाव शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका मोबाईवरून फोन आला. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून बंडखोर आमदारांविरुध्द एकही शब्द बोलू नको. अन्यथा तुला जिवेठार मारण्यात येईल, अशी धमकी दिली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धमकी देणाऱ्या अनोळखी व्यक्तीला तातडीने अटक करावी अशी मागणीचे निवेदन धरणगाव पोलीसांना देण्यात आले.