मुंबई : वृत्तसंस्था
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित 1800 वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. साधूग्राम उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या या वृक्षतोडीतून ‘साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी घालण्याचा सरकारचा संधिसाधूपणा’ असल्याचा आरोप त्यांनी केला.
2027 च्या कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून तपोवनातील झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे आश्वासन दिले असले तरी विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. या वादात आता राज ठाकरेही उतरले आहेत. त्यांनी शनिवारी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, “नाशिकमध्ये कुंभमेळा हे काही पहिल्यांदाच होत नाही. मनसेच्या सत्ताकाळातही कुंभमेळा झाला. आम्ही पायाभूत सुविधा उभारल्या, प्रशासनाशी उत्तम संवाद ठेवला आणि एकही झाड न तोडता नियोजन केले. तेव्हाच्या महापौर व आयुक्तांचा अमेरिकेत सत्कार झाला होता. मग यावेळी 1800 झाडांची कत्तल का?”
सरकारकडून झाडांची भरपाई म्हणून दुसरीकडे वृक्षलागवडीचे आश्वासन देण्यात येत असले तरी त्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. “अशी पोकळ आश्वासने देऊ नयेत. जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे, तर तिथेच साधुग्राम करा,” असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर तीव्र हल्लाबोल करताना म्हटले, “कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडा, जमीन सपाट करा आणि नंतर ती लाडक्या उद्योगपतीला दान करा — इतकाच विचार सरकारचा दिसतोय. महाराष्ट्रात आज जमिनी गिळणं किंवा उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सुरू आहे. मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि वर्तुळं यात गुंतली आहेत.” भाजप सरकारने पूर्वी ‘कोटी झाडे लावल्याची’ घोषणा केली होती, पण “त्या कोटी झाडांचा पत्ता कुठेच नाही,” असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असताना राज ठाकरेंच्या सहभागामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


