जळगाव : प्रतिनिधी
मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अक्कलकुवा परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुभराम कैलास बारेला (वय २०, रा. सावखेडा, ता. यावल) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभराम बारेला हा आपल्या आई-वडिलांसोबत सावखेडा सीम येथे राहत होता आणि जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. ७ नोव्हेंबर रोजी तो गावातील मित्र संदीप बारेला व मनिष बारेला यांच्यासह दुचाकीने नंदुरबार जिल्ह्यातील देव मोगराई देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाला होता.
अक्कलकुवा जवळून जात असताना पुढे असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने त्यांच्या दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात शुभराम गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच शुक्रवारी, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत.


