जळगाव : प्रतिनिधी
हॉटेल विक्रीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा गंभीर परिणाम म्हणून के पी. प्राईड हॉटेलचे मालक खुबचंद प्रेमचंद साहित्या (६०, रा. मोहाडी रोड) यांना चार अनोळखी इसमांनी रुममध्ये घुसून बेदम मारहाण केली. बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाकिटातील २० ते २५ हजारांची रोकड जबरीने काढून आरोपी पसार झाले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलच्या रुम क्रमांक २०७ मध्ये घडली. शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुबचंद साहित्या यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलगा नितीन साहित्या यांनी काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांनी के पी. प्राईड हॉटेल विक्रीस ठेवले होते. दोन वेळच्या व्यवहारांचे सौदे झाले तरी प्रत्यक्ष खरेदी न झाल्याने व्यवहार रद्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या वेळी दहा कोटी रुपयांचा सौदा होऊन तीन कोटी रुपयांवर सौदापावती झाली होती. मात्र सात–आठ महिने उलटूनही खरेदी प्रक्रियेत कोणतीही प्रगती झाली नाही.
दरम्यान, २६ नोव्हेंबरच्या रात्री खुबचंद साहित्या हे आपल्या रुममध्ये विश्रांती घेत असताना चार अनोळखी इसमांनी अचानक रुममध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला चढवला. कमरेला लावलेल्या बेल्टसह, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांनी टेबलावर ठेवलेल्या पाकिटातील २०–२५ हजारांची रोकड लंपास केली. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या साहित्या यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पुतण्याने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हल्लेखोरांपैकी देवेंद्र आणि निखिल (पूर्ण तपशील उपलब्ध नाही) यांची ओळख पटल्याचे सांगितले. साहित्या यांच्या जबाबावरून या दोघांसह आणखी दोन संशयितांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


