भुसावळ : प्रतिनिधी
निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमलेल्या टोळीवर मोठी कारवाई करत तिघांना रंगेहाथ पकडले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट भागात घडली. पथकाने गावठी पिस्तूल, चॉपर, मिरची स्प्रे, तीन विनानंबर मोटारसायकली, मोबाइल फोन यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते; मात्र गुरुवारी सकाळी आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी रात्री सुमारे १० वाजता पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह पो.हे.कॉ. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रमण सुरळकर, प्रमोद तायडे, सोपान पाटील, पो.कॉ. सचिन चौधरी, हर्षल महाजन, प्रशांत सोनार, जावेद शहा, भूषण चौधरी, गौरव सपकाळे आदी शहरात पेट्रोलिंग करत होते. आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागील बाजूस संशयास्पद हालचाल दिसताच पथकाने तत्काळ धाव घेतली आणि तिघांना पकडण्यात यश आले.
अटकेत आलेल्यामध्ये शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (२४), मृत्युंजय ऊर्फ भोला सत्येंद्र कवीशेखर (४३), राजू ऊर्फ शिवकुमार भगवानदास माणिक (१९) यांचा समावेश असून ते सर्व मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृत्युंजयकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, शुभमकडून चॉपर, तर शिवकुमारकडून मिरची स्प्रे, २० फूट दोर, दोन मोबाइल फोन आणि तीन विनानंबर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपींनी धक्कादायक माहिती उघड केली. भुसावळातील बंटी परशुराम पथरोड व शिव पथरोड यांनी त्यांना शहरात बोलावून अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस टकले यांच्याकडे पाठवले. या दोघांनी सराफ बाजारातील दुकाने व बंगले दाखवून दरोड्याची योजना आखल्याचे समोर आले. नियोजनानुसार आरोपी भाजी मार्केट परिसरात एकत्र जमले होते; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे कट हाणून पाडण्यात आला.
गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवत अरुण रंधे आणि तेजस टकले या दोघांना अटक केली आहे. पकडलेल्या पाचही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. तिवारी यांच्या न्यायालयात हजर केले असता १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी स्वतः घटनास्थळी येऊन तपासली. सतर्क पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.



