सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले होते. अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीवर राजन पाटील यांचे वर्चस्व होते. ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे दिसून आले. सत्ता कायम ठेवण्यासाठी विविध राजकीय हालचाली घडत होत्या. म्हणूनच 17 जागा बिनविरोध करून दाखवणाऱ्या पाटील यांची ताकद दाखवली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच नवा संघर्ष उभा राहिला. राजन पाटलांची सून उमेदवार असताना, अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर गावात दडपशाही, धमकी यांसारख्या घडामोडी घडल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. उज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून बाद केला गेला आणि या वादाची ठिणगी आणखी भडकली.
उज्वला थिटे यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले मात्र, न्यायालयानेही याचिका फेटाळली. तरीही त्या माघार घेण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. त्यांनी लढा सुरूच राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर हा मुद्दा सोलापूरच्या वडाळा भागातील कार्यक्रमात गाजला. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उज्वला थिटे यांचा सत्कार करून त्यांना मजबूत पाठबळ दिले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता, राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, दमदाटी करून काही चालत नाही, प्रत्येकाचा फुगा एके दिवशी फुटतो, मस्ती दाखवणाऱ्यांना लोक खड्यासारखे बाजूला फेकतात, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
महिला सोनं करतात, त्यांना संधी मिळाली पाहिजे, म्हणत अजित पवार यांनी उज्वला थिटे यांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याचा संदेश दिला. आपल्या लाडक्या बहिणी इथे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी आम्ही आहोत्र, असे म्हणत त्यांनी आगामी राजकीय लढाईची दिशा सूचित केली. महिलांसाठीच्या योजनांची माहिती देताना, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली. संपूर्ण राज्यात लाखो महिलांना त्याचा फायदा निश्चित होणार आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात महिलांचा सन्मान, हक्क आणि राजकारणातील सहभाग या मुद्द्यांवर विशेष भर होता.
अजित पवारांचा सूर पूर्ण भाषणभर आक्रमक होता. गावचे बोरी तेच गावचे बाभळी, अशा म्हणीच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक राजकारणातील संघर्ष स्पष्ट दाखवून दिला. कोणी अरे म्हणाल तर कारे म्हणणारे आपण आहोत, अशा वाक्यांतून त्यांनी कार्यकर्त्यांना उभारी दिली. पुढील निवडणुकीत चांगल्या विचारांची माणसं पुढे आणा, नव्यांना संधी द्या, जुन्यांचा अनुभवही घ्या, असा सल्ला देत त्यांनी परिवर्तनाची हाक दिली.


