प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील तीघ्रे गावातून गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यावर मध्यरात्री छापा टाकून सुमारे १ कोटी ६ लाख २० हजार रूपये किंमतीचा ८८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका तरूणाला अटक केली असून मंगळवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे गावात एक तरूण अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीसांच्या मदतीने तिघ्रे गावात सोमवारी ४ जुलै रोजी मध्यरात्री छापा टाकला. गावातील मनोज रोहिदास जाधव यांच्या घराच्या मागच्या खोलीत १ कोटी ६ लाख २० हजार रूपये किंमतीचा ८८५ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणात राहूल काशिनाथ सुर्यवंशी (वय-२५) रा. वाडी शेवाडा ता. पाचोरा या तरूणाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जालींदर पळे, पोउनि अमोल वाघ, सहाय्यक फौजदार युनुस शेख, वसंत लिंगायत, रवि नरवाडे, सुनील दामोदरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, अक्रम शेख, संदीप साळवे, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील यांनी केली.