पुणे : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापत असताना महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टीका केली. “लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतील, हा भ्रम चुकीचा आहे. जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागावाच लागतो,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांना सज्जड सुनावले.
फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाहीत, याची मला कल्पना नाही. निवडणुकांत लोकांमध्ये जाणे हेच लोकशाहीचे खरे स्वरूप आहे. ज्याला मतदारांमध्ये जायचे आहे तो जातो, ज्याला वाटत नाही तो जात नाही. मला त्याबाबत काही म्हणायचे नाही.” त्यांच्या वक्तव्यामुळे मविआच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळाचे मत आहे.
यानंतर त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाला वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर दिले. “लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महायुतीची आहे. सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहोत. स्थानिक पातळीवर युती वेगळी असली तरी सरकारी योजना कोणत्याही एका पक्षाची नसतात,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून गरज पडल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची चेतावणी दिली आहे. या आरोपांबद्दल विचारले असता फडणवीसांनी अल्पच प्रतिक्रिया दिली. “अंजली दमानिया नक्की काय म्हणाल्या हे मला माहीत नाही,” असे सांगत त्यांनी विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.


