मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. जितेंद्र सिंग यांनी मुंबईतील आयआयटी कार्यक्रमात “IIT Bombay चं नाव बदलून IIT Mumbai न केल्यानं चांगलं झालं” असं विधान केलं होतं. या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी फेसबुकवरून थेट प्रहार केला.
राज ठाकरे म्हणतात, “हे विधान एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे.” त्यांच्या मते, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न दशकांपूर्वीही झाला होता; तो मराठी माणसाने परतवून लावला. मात्र, केंद्रात आता त्याच प्रकरणाला पुन्हा हवा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात की, मुंबईचं नाव ‘मुंबई’ हे मूळ मुंबादेवीच्या नावावरून पडलेलं आहे. “म्हणूनच हे नाव काही लोकांना खटकतं,” असा दावा त्यांनी केला. ते पुढे मराठी जनतेला आवाहन करत म्हणतात, “एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व मराठी लोकांनी आता तरी जागं व्हायला हवं. मुंबई आणि मराठी माणूस यांना वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चित सुरू आहे.”
राज ठाकरे यांच्या मते, केंद्र सरकारने चंदीगढवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पंजाबने विरोध केल्यामुळे केंद्राला मागे हटावं लागलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मुंबईबाबतही असाच डाव शिजतोय. आधी नावावरून खेळ, नंतर हळूहळू ताबा.” राज ठाकरे यांनी एमएमआर परिसर गुजरातला जोडण्याचा गुप्त प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबईतील उद्योग, जमीन आणि संसाधने यांच्यावर केंद्र सरकारचा डोळा आहे. त्यांच्या मते, “हे सगळं डोळ्यांसमोर घडत आहे. मराठी माणसाने हे आता तरी समजून घ्यायला हवं.”
राज ठाकरे यांच्या या फेसबुक पोस्टने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात चांगलंच तापलं आहे. मुंबई नावाच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता केंद्र–राज्य संबंध, मुंबईची ओळख आणि मराठी अस्मिता यावर येऊन पोहोचला आहे.


