मुंबई : वृत्तसंस्था
परळीतील प्रचारसभेत केलेल्या एका विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे नव्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सभेत आठवण काढल्याचे त्यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. “आज एक व्यक्ती सोबत नाही, याची जाणीव होते,” असे त्यांनी म्हटल्याने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ आणि उद्देश यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणातील आरोपीचा सार्वजनिक सभेत उल्लेख योग्य होता का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला असून या वक्तव्याने प्रचारसभेपेक्षा वादाला अधिक उधाण आले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर अत्यंत कठोर टीका केली. “असा माणूस जर कुणाला आठवत असेल, तर त्याच्याइतका नीच दुसरा कोणी नाही,” असे म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला. गुंडगिरी, जमिनी बळकावणे आणि लोकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचा अभाव जाणवतो असे विधान करणारे नेते समाजासमोर कोणता आदर्श ठेवत आहेत? असा सवाल त्यांनी केला. जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवरही निशाणा साधत, गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजकीय पाठींब्यामुळेच समाजात गुन्हेगारी वाढते, असा आरोप केला.
या घटनेनंतर मराठवाड्यातील राजकीय वातावरण अधिक तंग झाले आहे. काहींना मुंडेंचे विधान वैयक्तिक आठवणीतून आलेले वाटत असले तरी, बहुसंख्यांना हा संदर्भ अयोग्य वेळ आणि अयोग्य व्यक्ति निवड असल्याचा ठपका आहे. दुसरीकडे जरांगे यांच्या आक्रमक प्रतिक्रियेने वादंगाला नवी दिशा मिळाली आहे. परिस्थिती पाहता प्रदेशात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


