मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणेला वेग दिला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण ठळकपणे समोर येऊ लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना भाजपकडून दिलेला धक्का राजकीय चर्चेत भर टाकणारा ठरला आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे गटातील मोठी घडामोड समोर आली आहे.
ठाकरेसेनेच्या 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी थेट निवडणुकीतून माघार घेतली असून स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या उमेदवारांनी “पक्षाकडून सहकार्य मिळत नाही” असा आरोप करत निषेध म्हणून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तटस्थ राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रेणापूरची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले होते, परंतु अंतर्गत अडथळे आणि स्थानिक मतभेद यामुळे उमेदवारांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. रेणापूरमध्ये दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी चौरंगी लढत अपेक्षित होती. मात्र अचानक उमेदवारांच्या माघारीमुळे निवडणूक गणित बदलले असून, हे उमेदवार गुप्तपणे कोणाला पाठिंबा देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मोठी राजकीय हालचाल झाली आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला धक्का बसला असून,
शिवसेना (शिंदे गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद ढोके यांनी थेट भाजपात प्रवेश केला आहे. ढोके यांच्या निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली असून शिंदेसेनेत अस्वस्थता वाढली आहे. भाजपने शिंदे गटाचा प्रमुख उमेदवार खेचून घेतल्याने फुलंब्रीतील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना येथील लढत अधिक रोचक होण्याची शक्यता आहे.


