मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांना पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री सुमारास वरळी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. आज त्यांना न्यायालयात उभे करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी वरळी येथील फ्लॅटमध्ये गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे–गर्जे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे आणि गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र या कालावधीत अनंत गर्जे यांचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती गौरी यांना मिळाल्याचे सांगितले जाते. या मानसिक त्रासातूनच गौरी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
गौरीच्या माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनुसार या प्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे–आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गर्जे फरार झाले होते. रविवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास अनंत गर्जे यांनी स्वतःहून वरळी पोलिस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिस न्यायालयात कोणता युक्तिवाद मांडतात आणि गर्जे कोणते प्रतिपादन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो : गर्जे
आपल्या जबाबात गर्जे यांनी सांगितले की, “मी घरी नव्हतो. परत आल्यावर दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे इमारतीच्या 31व्या मजल्यावरून खिडकीच्या मार्गाने 30व्या मजल्यावरील घरी उतरलो. आत गेल्यावर गौरीने गळफास घेतलेला दिसली.”
घटनेच्या काही वेळ आधी गर्जे यांनी गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून “तुमची मुलगी आत्महत्या करतेय, तिला समजावून सांगा” असे सांगितले होते. वडिलांनी मुलीशी फोन लावण्याची विनंती केली असता गर्जे यांनी लगेच “मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे” असे सांगितले. थोड्या वेळाने त्यांनी गौरीच्या आईला फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. या सर्व घटनाचक्रामुळे पालवे कुटुंब हादरले असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
गत सप्टेंबरमध्ये घर बदलताना गौरीला काही कागदपत्र सापडली. त्यात एका महिलेचा ‘पती’ म्हणून अनंत गर्जे यांचे नाव नमूद होते. ही बाब गौरीने वडिलांना सांगितल्यावर, “तुझे आई-वडील मला जाब विचारायला आले तर मी सुसाईड नोट लिहून आत्महत्या करेन आणि तुझ्या नावाचा उल्लेख करेन” अशी धमकी गर्जे यांनी दिल्याचा आरोप आहे.


