धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे तसेच आसपासच्या शेतशिवारात सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकरी वर्गाचे हाल वाढले आहेत. दिवसा शेतीची कामे करून रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याची वेळ आल्याने बळीराजा अक्षरशः हैराण झाला आहे. दिवसा चार दिवस वीजपुरवठा असला, तरी उर्वरित तीन दिवस रात्री वीज देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस रात्रपाळी करावी लागत आहे.
सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर असून अशा परिस्थितीत रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. यंदा रब्बी हंगामात मका, गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पाटाचे आवर्तन अद्याप सुरू नसल्याने विहिरसिंचनावरच शेतकऱ्यांचा आधार आहे. मात्र कमी–जास्त दाबाच्या विजेमुळे पंप जळण्याच्या घटना वाढल्या असून शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे.
दिवसा सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या कोणीच ऐकून घेत नसल्याने बळीराजाच्या मनात ‘आम्ही कोणाकडे दाद मागावी?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.


